Wednesday, 9 July 2014

वीर वामनराव जोशी

वीर वामनराव जोशी – हे मूळचे समशेरपुरचे. शिक्षणाच्या निमित्ताने नाशिकला गेले असताना गुप्त क्रांतिकारकांशी त्यांचा परिचय झाला. ७ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. परंतु देशप्रेम त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. गुप्त क्रांतिकारकांच्या मैत्रीतून आपणही देशासाठी काहीतरी करावे अशी तीव्र उर्मी त्यांना वाटत होती. शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी स्वदेशी आणि बहिष्काराची शपथ घेतली. त्यातूनच बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले.अहमदनगर शहरातील गुजर गल्लीत बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण देण्याचे कामही त्यांनी सुरु केले. 

त्याचवेळी इंग्रजांनी लो.टिळकांना ६ वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. अनंत कान्हेरे, वामनराव जोशी व त्यांच्या सहका-यांनी इंग्रज कलेक्टर जॅक्सनच्या खुनाची योजना आखली. २३ डिसेंबर १९०९ रोजी जॅक्सनवर गोळ्या झाडून त्याचा खून केला. या प्रकरणी इंग्रजांनी ७ आरोपींवर खटला चालविला. यात अकोल्याचे वीर वामनराव जोशी एक होते. त्यांना २५ वर्षाच्या जन्मठेपेची शिक्षा झाली. मे १९२२ मध्ये त्यांची सुटका झाली. परंतु स्वस्थ न बसता त्यांनी १९३० च्या "जंगल सत्याग्रहात" अग्रभागी राहिले. म.गांधींच्या चळवळीत ते सहभागी होते. 

जुलमी मामलेदाराचा वध
इंग्रजांच्या काळात पिरजादे तथा काझी मामलेदार हा एक जुलमी व विलासी मामलेदार होता. त्याला मासे पकडण्याचा छंद होता. त्यामुळे त्याची कचेरीच नदीवर भरायची. खास यासाठी त्याने नदीवर घाट बांधून घेतला. तो जबरदस्तीने तरुणांना लष्कर भरतीसाठी पाठवित असे. म्हाळादेवी धरणाचे काम सुरु असताना त्याला होणारा विरोध मोडून काढण्यासाठी इंग्रजांनी या माम्लेदाराला विशेष अधिकार दिले होते. एकदा अगस्ति आश्रमातील काही तरुण संन्याशी नदी ओलांडून येत असताना या मामलेदाराने त्यांना पकडून बळजबरीने त्यांच्या तोंडात मासे कोंबले. आणि लष्करात भरती होण्याची बळजबरी केली. यामुळे तालुक्यातील जनता संतापाने पेटून उठली. 

त्यावेळी अकोल्यात दर शनिवारी आठवडे बाजार भरत असे. पूर्व नियोजन करून परिसरातील हजारो शेतकरी, आदिवासी जनता कु-हाडी, काठ्या अशी मिळेल ती हत्यारे घेऊन बाजारच्या निमित्ताने अकोल्यात गोळा झाली. नियोजनानुसार या लोकांचे गट पाडले होते. काही गट संगमनेरहून येणा-या रस्त्यावर थांबले. त्यांनी रस्त्यावर मोठ्या झाडांच्या फांद्या पाडून रस्ता अडवून ठेवला. एक गट सरळ कचेरीकडे गेला व फाटकाला कुलूप लावून पोलिसांना धमकावून कोंडून ठेवले. तिसरा गट मामलेदाराला धडा शिकविण्यासाठी त्याच्या वाड्यावर गेला. 

वेळ बघून मामलेदाराच्या बायकोने जमावापुढे पदर पसरून त्याच्या जीवाची भीक मागितली. जमावाच्या प्रक्षोभाने घाबरलेल्या मामलेदाराने जमावाच्या दिशेने गोळी झाडली. त्यात रावजी यादव हुतात्मा झाले. यामुळे जमाव आणखीनच भडकला. तेवढ्यात मामलेदाराने दुसरी गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. परंतु गोळी सुटलीच नाही. संतापलेल्या जमावाने मामलेदाराच्या कुटुंबियांना सुरक्षितपणे वाड्याबाहेर काढले आणि मिरची पूड व रॉकेल टाकून वाडा पेटवून दिला. भयभीत झालेला मामलेदार जिवाच्या भयाने सैरावैरा पळू लागला. जमावातील काहींनी त्याला पकडून त्याच्यावर कु-हाडी चालविल्या. संतप्त जमावाने खांडोळी केलेला मामलेदाराचा देह त्याच्याच घोडा गाडीत टाकून पेटलेल्या वाड्याच्या आगीत लोटून दिला. 

इंग्रज सरकारच्या या जुलमी मामलेदाराचा वध ही अकोल्यातील जनतेसाठी अभिमानाची घटना बनून राहिली आहे.

रामजी भांगरे

आदिवासी डोंगराळ भागात राहणा-या कोळी, भिल्ल, ठाकर या पराक्रमी वीरांनी इंग्रजांविरुद्ध कडवा संघर्ष करून त्यांना सळो कि पळो करून सोडले. १७९८ ते १८४८ या ५० वर्षांच्या काळात अकोल्याच्या कोळी बांधवांनी, रामजी भांगरे, राघोजी भांगरे, रामा किरवा, गोविंदराव खाडे इत्यादींनी इंग्रज सरकार विरोधात प्रखर लढा दिला. 

रामजी भांगरे यांची इंग्रजांनी पोलीस जमादार म्हणून नेमणूक केली होती. तरीही त्यांनी इंग्रजांच्या अनेक जाचक अटीं विरोधात आवाज उठविला. कोळी बांधवाना एकत्र करून जुलमी सावकारांवर हल्ले केले. रामजीचे बंड मोडण्यासाठी कॅप्टन मॅकींतोष याने सर्व बाजूंनी नाकाबंदी करून त्याच्या काही साथीदारांना पकडले. रामजीचा कडवा साथीदार रामा किरवा त्यांच्या हातून निसटला. त्याने पुढे आपल्या चपळ हालचालीने इंग्रजांना बेजार केले. भिल्ल कोळी जमातीतील लोकांच्या मदतीने रामजीने अनेक जुलमी सावकारांवर दरोडे टाकले. कॅ.लेफ्टनंट फोर्बस् याने रामा किरवाला त्याच्या साथीदारांसह पकडले. राजद्रोहाच्या आरोपाखाली त्याला नगरच्या किल्ल्यात १८३० मध्ये सर्वांसमक्ष फाशी दिले. रामजीलाही काळ्या पाण्याची शिक्षा झाली. इंग्रजांच्या व सावकारशाहीच्या विरोधात लढून फाशी गेलेला रामा किरवा हा महाराष्ट्रातील पहिला हुतात्मा ठरला. 

यामुळे इंग्रजांविरुद्धचे बंड शमले असे नाही. पुढे रामजीचा मुलगा राघोजी यानेही सावकारांवर छापे टाकून इंग्रजांविरुद्धचा असंतोष धगधगता ठेवला. तो आपली आई, पत्नी, भावजई यांच्यासह देवगावला राहत होता. राघोजी हा उमदा, चपळ, शूर व धाडसी वीर होता. राघोजीचा ठावठिकाणा शोधण्यासाठी इंग्रजांनी त्याच्या आईचा छळ सुरु केला. त्यामुळे तो आणखीनच संतापून इंग्रजांविरुद्ध पेटून उठला. त्यातच त्याला पकडण्यात इंग्रजांना यश आले. त्याला हातपाय बांधून राजुरच्या कोठडीत टाकले. परंतु त्याच्या आईच्या कल्पकतेने व पहा-यावरील जावजी बांबळेच्या सहका-याने तो सुटला. आणि परत देवगावात जाऊन देवजी महार, पाडोशीचा खंडू साबळे, चिचोंडीचा भाऊ धनगर यांच्या साथीने टोळी उभारून १८४४-४५ या काळात त्याने इंग्रजांना व सावकारांना त्रस्त करून सोडले. 

पुढे फंदफितुरीने ही टोळी विस्कळीत झाली. त्यातच १८४५ च्या चकमकीत राघोजीचे अध्यात्मिक गुरु व मार्गदर्शक देवजी महार ठार झाल्याने तो आणखीनच खचला. राघोजी धार्मिक वृत्तीचा असल्याने आंबिवलीच्या पाटलाने त्याला दिंडी काढण्याचा आग्रह केला. वारकरी म्हणून तो त्यात सहभागी झाला. लेफ्टनंट गेलने २ जानेवारी १८४८ रोजी संन्याशाच्या वेशातील राघोजीला पंढरपूर येथील चंद्रभागेच्या वाळवंटात पकडले. त्याच्यावर राजद्रोहाचा खटला चालवून २ मे १८४८ रोजी ठाण्याच्या तुरुंगात त्याला फाशी दिले. 

राघोजीने फाशीवर जाताना विनंती केली कि मी चोर नाही मला फासावर देऊ नका, माझे मुंडके तलवारीने उडवा. मला वीराचे मरण द्या. ठाण्याच्या तुरुंगात या आद्य क्रांतिकारकाचा पुतळा उभारला आहे. दरवर्षी २ मे रोजी त्याचे पुण्यस्मरण केले जाते.

श्री.संजय रघुनाथ धोपावकर सर

          स्वर्णिम यशाच्या आठवणींचे अमौलिक सुवर्णक्षण ::- अहमदनगरच्या सुवर्ण युगाचा शिल्पकार सेन्सेई प्राध्यापक श्री.संजय रघुनाथ धोपावकर सर, भारतीय ज्युदो महासंघाच्या वतीने १९९१-९२ सालातील '' भारतातील सर्वोत्कृष्ट ज्युदो मार्गदर्शक '' पुरस्कार विजेते सर्वात तरुण मार्गदर्शक. ज्युदो बरोबरच अखिल भारतीय शरीर सौष्ठव स्पर्धेतील ( Body - Building ) '' युवक भारत श्री '' ह्या किताबाचे मानकरी त्याचप्रमाणे उत्कृष्ट मैदानी खेळाडू ( BEST ATHLETE ),एक अद्वितीय अलौकिक प्रतिभाशाली अष्टपैलू व्यक्तिमत्व. वडील बंधू आणि मार्गदर्शक श्री.धनंजय रघुनाथ धोपावकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,महाराष्ट्र पोलीस ह्यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली सेन्सेई प्राध्यापक श्री.संजय रघुनाथ धोपावकर सर ह्यांनी आणि यंगमेन्स ज्युदो असोसीएशनच्या सिद्धीबाग ज्युदो हॉल,अहमदनगरच्या त्यांच्या शिष्योत्तमांनी ज्युदो ह्या आंतरराष्ट्रीय खेळामध्ये विशेष उल्लेखनीय विक्रमी कामगिरी करून विद्यापीठ,राज्य,राष्ट्रीय अखिल भारतीय स्तरावर असंख्य सुवर्ण,रौप्य आणि कांस्य पदके जिंकून अतिशय दैदिप्यमान उत्तुंग यश मिळवले असून सलग पाच वर्षे सेन्सेई प्राध्यापक श्री.संजय रघुनाथ धोपावकर सरांच्या पाच विद्यार्थिनींनी ज्युदो मध्ये महाराष्ट्र राज्यातील शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार हा सर्वोच्च सन्मान मिळवण्याची विक्रमी कामगिरी देखील केलेली आहे.

- : त्यावेळेसच्या काही वर्तमानपत्रांमधील कात्रणे :-

अण्णा हजारे


पद्मश्री, पद्मभूषण, डॉक्टरेट, लोकनायक - किसन बाबूराव हजारे ऊर्फ अण्णा हजारे
            किसन बाबूराव हजारे ऊर्फ अण्णा हजारे (जून १५, इ.स. १९३७:भिंगार, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र - हयात). मूळचे सैन्यात वाहनचालक असणारे . किसन बाबुराव तथा अण्णा हजारे हे भारतातील एक ज्येष्ठ महाराष्ट्रीय समाजसेवक आहेत. १९९० साली त्यांना त्यांच्या समाज सेवेच्या कार्याबद्दल भारत सरकारने पद्मश्री आणि १९९२ साली पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केले. त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार चळवळीद्वारे राळेगण सिद्धी या गावाचा कायापालट घडवून आणला आहे. स्वच्छता, पाणी व्यवस्थापन व सामाजिक सलोखा यावर त्यांनी भर दिला होता. या कामाबद्दल गावाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. या नंतर अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकारासाठी आंदोलन केले. माहितीच्या अधिकारावर त्यांनी पुस्तकाचे लेखनही केले आहे. या आंदोलनामुळे सरकारला माहितीचा अधिकार सर्वसामान्यांना देण्याचा कायदा लवकर संमत करावा लागला. अण्णा हजारे यांनी वेळोवेळी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलने करून जनजागृतीची कामे केली आहेत. त्यांच्या आंदोलनांमुळे महाराष्ट्राच्या अनेक मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत.

           किसन हजारेंचा जन्म जून १५, इ.स. १९३७ रोजी भारताच्या मुंबई इलाख्यातील भिंगार मधील खोमणे वाड्यात झाला. हे गाव आता महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यात आहे. हजारेंचे वडील बाबूराव हजारे तेथील आयुर्वेद आश्रम औषधशाळेत मजूर होते. बाबूरावांचे वडील ब्रिटिश फौजेत सैनिक होते. १९४५मध्ये आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर बाबूरावांनी सुरुवातीला भिंगारमध्येच बस्तान बसवले, पण नंतर १९५२ साली ते राळेगण सिद्धी या आपल्या मूळ गावी परतले. किसनयांना सहा लहान भावंडे होती व कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. त्याच्या आत्याने किसनची देखभाल करण्याचे ठरवले व शिक्षणासाठी त्या त्याला मुंबईला घेऊन गेल्या. सातवीपर्यंत शिकल्यावर घरात मदत व्हावी म्हणून किसनने शिक्षण सोडून नोकरी शोधण्यास सुरुवात केली. त्यासाठी सुरुवातीस दादरजवळ फुले विकली व नंतर स्वतःचेच दुकान थाटले व आपल्या दोन भावांना राळेगण सिद्धीहून बोलावले.


          इ.स. १९६२च्या सुमारास चीनने भारतावर आक्रमण केलेले असताना भारतीय सैन्याने धडाक्यात भरती सुरू केली होती. त्यावेळ २५ वर्षांचे असलेले हजारे लष्कराच्या किमान शारीरिक क्षमतेस पात्र नव्हते, पण कोणत्याही परिस्थितीत नवीन जवान भरती करणे आवश्यक असल्याने लष्कराने त्यांना भरती करून घेतले. औरंगाबाद येथे सुरुवातीचे प्रशिक्षण घेतल्यावर १९६३मध्ये त्यांना वाहनचालकाचे पद दिले गेले.

         त्यानंतर दोन वर्षातच पाकिस्तानने भारतावर चाल केली. त्यावेळी हजारेंचा मुक्काम पंजाबमधील खेमकरण क्षेत्रात होता. नोव्हेंबर १२, इ.स. १९६५ रोज पाकिस्तानी वायुसेनेने भारतीय ठाण्यांवर हल्ले सुरू केले. हजारे त्यावेळी इतर वाहनांसह आपले वाहन चालवीत होते. या हल्ल्यात त्या तांड्यातील ते स्वतः सोडून एकूणएक जवान शहीद झाले. हे पाहून विषण्ण झालेल्या हजारेंनी जगण्यातील अर्थ शोधण्यास सुरुवात केली. आपल्या प्रवासात नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील एका दुकानात त्यांच्या हाती राष्ट्रनिर्मितीसाठी युवा पिढीला आवाहन हे स्वामी विवेकानंद यांनी लिहिलेले पुस्तक पडले. हे वाचताना त्यांना गमले की अनेक संतांनी इतरांच्या सुखासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केलेला आहे. आपण आपले उरलेले आयुष्य गरीबांची दुःखे दूर करण्यात घालवावे असे त्यांना वाटू लागले. यानंतर फावल्या वेळात त्यांनी महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद आणि विनोबा भावे यांचे साहित्य वाचण्यास सुरुवात केली. यानंतर काही वर्षांनी १९७०च्या दशकात त्यांची मृत्यूशी पुन्हा एकदा जवळून गाठ पडली. वाहन चालवीत असताना भीषण अपघातातून ते बचावले. या क्षणी त्यांना वाटले की आपल्या उरलेल्या आयुष्याचा सदुपयोग करण्यासाठी जणू काही दैवच त्यांना इशारे देत आहे. वयाच्या ३८व्या वर्षी किसन हजारेंनी आपले उरलेले आयुष्य इतरांच्या सेवेसाठी वेचण्याचा संकल्प सोडला. १९७८मध्ये त्यांनी भारतीय लष्कराचा राजीनामा दिला.

        लष्कर सोडल्यावर हजारे राळेगण सिद्धी या आपल्या मूळ गावी परतले हे गाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यात आहे. जवळजवळ कायमच्या दुष्काळी प्रदेशात असलेल्या या दुर्लक्षित गावात त्यावेळी गरिबी आणि निराशेचा सुकाळ होता. हजारेंनी ग्रामस्थांसह अनेक दशके अथक प्रयत्न करून गावाचा कायापालट केला. आर्थिक आणि सामाजिक अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांनी गावातील परिस्थिती सुधारली. तंत्रज्ञान किंवा औद्योगिकीकरणाचा आधार न घेता केवळ अतोनात कष्ट आणि सहकार यांवर त्यानी गावातील गरिबी दूर करण्यात यश मिळवले.


आंदोलने आणि चळवळी

          अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराचा निपटारा करण्याकरिता वेळोवेळी आंदोलने केली व प्रसंगी कारावासही स्वीकारला. १९८० पासून आतापर्यंत अण्णा हजारे यांनी १६ उपोषणे केली आहेत. प्रत्येक वेळी सरकारला त्यांच्यासमोर नमते घ्यावे लागले.त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या.अण्णाची १६ पैकी १३ उपोषणे ही महाराष्ट्र सरकारच्या विरोधातील तर ३ उपोषणे केंद्र सरकारच्या विरोधात करण्यात आली आहेत.


            यांतील १५वे आणि १६वे उपोषण हे जनलोकपाल विधेयकासाठीचे होते. अण्णांनी एकूण आतापर्यंत ११६ दिवसापेक्षा जास्त काळ उपोषण केले आहे. अण्णाच्या या उपोषणांमुळे आणि आंदोलनामुळे महाराष्ट्र सरकारला ४५० अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागली तर ६ मंत्र्यांना आपले पद गमवावे लागले आहे.

              अण्णांनी पहिले आंदोलन १९७९ मध्ये केले. शासकीय यंत्रणेकडून हेळसांड होऊन गावास वेठीस धरणार्‍या प्रशासनाविरुद्ध गावातील शाळेला मान्यता मिळण्यासाठी, या आंदोलनादरम्यान अहमदनगर जिल्हा परिषदेसमोर अण्णांनी १९८० साली पहिले यशस्वी उपोषण केले. अण्णांच्या उपोषणाने एका दिवसातच सरकारी यंत्रणेला झुकविले. अण्णांची मागणी मान्य झाली. अण्णांच्या सक्रिय सामजिक चळवळीच्या जीवनातला हा पहिला प्रसंग होता. सत्याग्रहाच्या आणि अहिंसेच्या मार्गाच्या लढ्याने अण्णांना पहिल्यांदाच मोठे यश मिळविता आले होते. उपोषण केले, प्रशासन झुकले आणि शाळेला मान्यता मिळाली. 'नापासांची शाळा' म्हणून ही शाळा प्रसिद्ध आहे.

            महाराष्ट्र सरकारतर्फे राबविल्या जाणाऱ्या वीस कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी होण्याकरिता राळेगण सिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरात अण्णांचे दुसरे यशस्वी उपोषण ७ -८ जून १९८३ साली झाले. ग्राम विकास योजना अंमलात आणत असताना सरकारी अधिकाऱ्यांची टाळाटाळ आणि निवडणूक यांच्या विरोधातील हे आंदोलनही यशस्वी झाले. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. ग्राम विकास योजनांच्या मंजुरीबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी लिखित आश्वासन दिले.उपोषण केले. याचा परिणाम म्हणून ग्रामविकासात सरकारचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला.

               अण्णांनी तिसरे उपोषण २० ते २४ फेब्रुवारी १९८९ या काळात केले होते. हे उपोषण शेतकर्‍यांकरिता होते. गावाला पाणी पुरवठा करण्याचे धोरण व व ठिबक सिंचन अनुदान धोरण यांत फार त्रुटी होत्या. त्या त्रुटी दूर करण्यासाठी हे उपोषण होते. सरकार पुन्हा झुकले ४ कोटी रुपये मान्य करत सिंचन योजनांना मंजुरी देण्यात आली.

            चौथे आंदोलन अण्णांना पुढील ९ महिन्यातच पुन्हा पुकारावे लागले. शेतकर्‍यांना सिंचनासाठी वीज पुरवठा मिळवून देण्यासाठीच्या प्रश्नासाठी २० ते २८ नोव्हेबर या दरम्यान १९८९ मध्ये ते पुकारण्यात आले होते. हे उपोषण ९ दिवस चालले. अखेरीस सरकारवर दबाव वाढला. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी लिखित आश्वासन दिले. वीज पुरवठ्यासाठी २५० केव्हीच्या लाईन आणि इतर सुविधांसाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले. दरम्यानच्या काळात अण्णांच्या कामाला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळू लागली होती.

              पाचवे उपोषण : सन १९९४ साली अण्णांनी वन विभागातील योजनामधील भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करण्याच्या निर्णय घेतला. सरकारशी अनेक वेळा संपर्क करुनही सरकारकडून कोणतही उत्तर मिळत नव्हते. अण्णाचे हे भ्रष्टाचाराविरोधातील पहिले उपोषण. महाराष्ट्र दिनी म्हणजे १ मे रोजी या उपोषणाला सुरवात झाली.हे उपोषण ६ दिवस चालले. १४ भ्रष्ट अधिकाऱ्यांपैकी ४ अधिकाऱ्यांना सरकारने निलंबित केले. दहा अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करू असे आश्वासन मिळाले.

                पुढील ६ वे उपोषण अण्णांनी १९९६ साली केले. त्यातही त्यांना यश आले. राज्यातील शिवसेना-भाजपा युती-सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात ते करण्यात आले. २० नोव्हेंबर १९९६ रोजी त्यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. मंत्र्याविरोधातील आरोप असल्याने लढाई मोठी होती. त्यामुळे उपोषणाचा कालावधीही वाढणार होता. उपोषण १२ दिवस चालले. आतापर्यंतचे अण्णाचे हे सर्वात मोठे उपोषण होते. ३ डिसेंबर १९९६ ला युतीच्या दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. जलसंधारण मंत्री होते महादेव शिवणकर आणि पाणी पुरवठामंत्री शशिकांत सुतार.

              अण्णांनी १९९७ सालीसुद्धा उपोषण केले.यावेळीही युती सरकारमधील भ्रष्टाचाराचाच मुद्दा होता. अण्णांच्या निशाण्यावर होते यावेळी युती सरकारमधील समाज कल्याणमंत्री बबनराव घोलप. उपोषण १० दिवस चालले. घोलपाना राजीनामा द्यावा लागला तर १८ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले.

             अण्णानी थेट मंत्र्यांविरोधात सुरू केलेली लढाई साहजिकच अडचणींना आमंत्रण देणारी होती. घोलप न्यायालयात गेले होते. न्यायालयात अण्णा घोलपावरील आरोप सिद्ध करू शकले नाहीत आणि अब्रुनुकसानीच्या आरोपाखाली अण्णांना मॅजिस्ट्रेट कोर्टाने तीन महिन्यांची साधी कैद दिली होती. याच्याही विरोधात अण्णांनी ९ ते १८ आगस्ट १९९९ दरम्यान १० दिवसाचे उपोषण केले. त्याच वेळी पाच हजार रुपयांच्या बाँडवर सोडून देण्याची अटही कोर्टाने घातली होती. ती सवलत नाकारून हजारे यांनी तुरुंगात जाणे पसंत केले होते. मात्र नंतर राज्य सरकारने त्यांना स्वत:च्या अधिकारात तुरुंगातून मुक्त केले. पुढे अपिलात सेशन्स कोर्टाने अण्णांना निर्दोष ठरवले.
१९९९ साली झालेल्या विधासभेच्या निवडणुकांमधे शिवसेना-भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला, आणि बबनराव घोलप पुन्हा मंत्री होऊ शकले नाहीत.

              सन २००३ - ९ दिवसाचे उपोषण राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेस या आघाडीचे सरकार होते. हे उपोषण माहितीच्या अधिकारासाठी होते. ९ ओगस्ट या क्रांतिदिनाच्या दिवशी या आंदोलनाला सुरुवात झाली. सरकारने माहितीचा अधिकार दिला. अण्णांचे उपोषण यशस्वी झाले.
माहितीचा अधिकार तर कायद्याने मिळाला मात्र तो अधिकाऱ्यांच्या लालफितीत अडकला. सरकारी अधिकारी अडवणूक करू लागले. अण्णांनी पुन्हा उपोषणाचं अस्त्र उगारले. १० वे उपोषण! मागण्या होत्या माहिती अधिकाराची योग्य अमलबजावणी करणे. दफ्तर दिरंगाईला लगाम लावणे आणि बदलीचा कायदा आणणे. ९ फेब्रुवारी २००४ साली सुरू झालेले हे उपोषण ९ दिवस चालले. सरकारने अण्णाच्या मागण्या मान्य केल्या, बदल्यांचा आणि दफ्तर दिरंगाईचा कायदा आला .

           अण्णांचं ११ वे उपोषण १० व्या उपोषणाच्या पुढचे पाऊल होते. माहिती अधिकाराच्या माध्यमातून अण्णांना समाजात जागरूकता आणायची होती. केंद्र सरकारने माहिती अधिकाराच्या कायद्यात सुधारणा करण्याचा घाट घातला होता. त्यामुळे महिती अधिकाराचा कायदा कमकुवत होणार होता अण्णांनी आळंदीला ९ ओगस्ट रोजी उपोषणाला सुरुवात, अण्णांना माहिती अधिकार कायद्यातल्या सुधारणा मान्य नव्हत्या. ११ दिवस हे उपोषण चालले. सरकारने मागणी मान्य केली. अण्णांच्या उपोषणाला मिळालेले हे ११ वे यश.

          साल २००६ मध्ये राळेगणसिद्धी इथे अण्णांच्या १२ व्या उपोषणाला सुरुवात झाली, हे उपोषण माजी न्यायमूर्ती पी बी सावंत आयोगाने दिलेल्या अहवालाच्या अंमलबजावणीसाठी होते. त्यात दोषी ठरवलेल्या मंत्र्यावर सरकारने कारवाई करावी या मागणीसाठी होते. पी बी सावंतानी अण्णांसह ३ मंत्र्यांना दोषी ठरवले होते, मात्र सरकारतर्फे या मंत्र्यांविरोधात कोणतीही कारवाई होत नव्हती. सुरेश जैन, पद्मसिंह पाटील आणि नवाब मालिक यांना मंत्रीपदे गमवावी लागली होती, मात्र या मंत्र्यांवर न्यायालयीन कारवाई मात्र होत नव्हती. सरकारने अण्णांना कारवाईचे आश्वासन दिले. अण्णांनी उपोषण मागे घेतले.

            हजारे यांनी माजी मंत्री सुरेश जैन यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांच्याविरुद्ध जैन यांनी बदनामीचा खटला भरला होता. हजारे यांनीसुद्धा जैन यांनी केलेल्या आरोपांची दखल घेऊन त्यांच्यावर बदनामीचा खटला भरला, ही दोन्हीही प्रकरणे अनिर्णीत आहेत.

             अण्णाच्या १२ व्या उपोषणाने भ्रष्ट मंत्र्यावर कारवाईचे आश्वासन तर मिळाले, मात्र त्यानंतर अण्णांना जीवे मारण्यासाठी ३० लाखांची सुपारी देण्यात आली. ही सुपारी खासदार पद्मसिंह पाटील यांनी दिली असा अण्णांचे म्हणणे होते. पद्मसिंह पाटलांवर कारवाई होत नव्हती. अखेरीस सरकारने गुन्हा नोंदवला, पद्मसिंह पाटलांना कैदेत जावे लागले. अण्णांच्या सत्याग्रहाला, उपोषणाला मिळालेले १३ वे यश होते.

            साल २०१० अण्णांनी १४ वे उपोषण केले ते सहकार चळवळीतल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात, सहकार कायद्यात आमूलाग्र बदल करावे या मागणीसाठी,. ठेवीदारांना ठेवी परत मिळाव्या यासाठी. १६ ते २० मार्च दरम्यान हे उपोषण झाले. सहकार कायदात सुधारणांची प्रक्रिया सुरू झाली. काही प्रमाणावर अण्णांना या उपोषणातही यश मिळाले .

               आता वेळ होती अण्णांच्या १५ व्या उपोषणाची केंद्राला इशारा देऊनही सरकार जागे होत नव्हते, जनलोकपाल कायद्याच्या मंजुरीसाठी हे उपोषण होते, भ्रष्टाचाराच्या विरोधातले हे आंदोलन. साहजिकचं भ्रष्टाचाराने पोळलेल्या जनसामान्यांनी अण्णांना उत्स्फूर्त पाठिंबा दिला. ५ ते ९ एप्रिल २०११ रोजी हे उपोषण दिल्लीतल्या जंतर मंतर मैदानावर झाले. सरकारवर वाढलेल्या दबावाने सरकारनेनं अण्णांशी बोलणी सुरू केली. कायद्याच्या मसुद्यासाठी सरकारच्या ५ मंत्र्यासह अण्णा आणि त्यांच्या सिव्हिल सोसायटीच्या ५ सदस्यासह जॉइन्ट ड्राफ्ट कमिटी  स्थापन झाली अण्णानी उपोषण मागे घेतले.

माहिती अधिकार
         हजारे यांनी माहितीच्या अधिकारासाठी आंदोलन केले. माहितीच्या अधिकार या विषयावर त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे. या आंदोलनामुळे सरकारला माहितीचा अधिकार सर्वसामान्यांना देण्याचा कायदा संमत करावा लागला.


भ्रष्टाचारविरोध / लोकपाल कायदा
दोन सप्टेंबर २०११ पर्यंत(म्हणजे एकूण पंधरा दिवस) उपोषणाला परवानगी देतानाच रामलीला मैदानाचा काही भाग आंदोलनासाठी, तर काही भाग वाहनतळ म्हणून वापरण्याची अटही यात मान्य करण्यात आली होती. प्रशासनातर्फे रामलीला मैदानावर साफसफाई केली गेली. जयप्रकाश नारायण पार्कसारख्या छोट्या जागेऐवजी रामलीला मैदानासारखी मोठी जागा अण्णांना आंदोलनासाठी मिळाली. जयप्रकाश नारायण पार्कमध्ये केवळ पाच हजार आंदोलकांनाच परवानगी दिली जाणार होती, रामलीला मैदानात जागा भरेल इतक्‍या आंदोलकांना सहभागी होण्याची परवानगी मिळाली. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्ली, चंदीगड, बंगळूर, चेन्नई, मुंबई, पुणे, कोलकता या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यात आली. दिल्लीमध्ये जंतर-मंतर व इंडिया गेट परिसरात आंदोलकांची गर्दी झाली होती. तिहारच्या बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी होती आणि ते अण्णा हजारे तुरुंगाबाहेर येण्याची वाट पाहत होते. विविध राज्यांमध्ये झालेल्या आंदोलनांत तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. देशभरात गावोगावी, शहरांमध्ये निदर्शने, मोर्चे, रॅली, 'कॅन्डल मार्च' काढून लहान मुलांपासून ते तरुण, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक अशा समाजाच्या सर्व थरांतील घटकांनी अण्णांच्या आंदोलनाला भरभक्कम पाठिंबा व्यक्त केला होता.


नुकतेच २६ डिसेंबर २०११ रोजी मुंबई येथे त्यांनी दोन दिवसांचे उपोषण केले. त्यानंतर जानेवारी २०१३ मध्ये झालेल्या राळेगण येथील आंदोलनात सरकारने लोकपाल बिल मंजूर केले.

आनंदऋषीजी महाराज





प.पु.राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज

          जैन धर्मियांचे आचार्य श्री आनंदऋषीजी महाराजांचा  जन्म श्रावण शुक्ल प्रतिपद २७ जुलै १९०० साली आपल्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यामधील चिचोंडी या गावी झाला. त्यांचे नाव नेमीचंद होते. त्यांच्या वडिलांचे नाव देवीचंदजी गुगळे आणि आईचे नाव हुलसाबाई. मोठ्या भावाचे नाव उत्तमचंदजी  होते. आनंदऋषीजी लहानपणासुनच पवित्र होते, त्यांचे गुरू रत्न ऋषीजी महाराज यांच्या कडून त्यांना लहानपनापासुनच आध्यात्मिक मार्गदर्शन मिळाले.


          आनंदऋषीजीनी वयाच्या १३व्या वर्षी त्यांचे सर्व आयुष्य जैन संत म्हणून व्यथित करण्याचे ठरविले. त्यांनी ७ डिसेंबर १९१३ साली(मार्गशिस शुक्ल नवमी) अहमदनगर जिल्हातील मिरी या गावी दिक्षा घेतली, त्यावेळी त्यांना आनंदऋषीजी महाराज हे नाव देण्यात आले.


          आनंदऋषीजीनी पंडित राजधरी त्रिपाठी यांच्याकडून संस्कृत आणि प्राकृत शिक्षणास सुरुवात केली. त्यांनी १९२० साली अहमदनगर येथे पहिले प्रवचन दिले.


          आनंदऋषीजीनी पुढे रत्नऋषीजी सोबत जैन धर्माच्या प्रसार व प्रसाराचे कार्य सुरु केले. जैन धर्मानुसार साधु किंवा साध्वी यांनी एका जागेवर न थांबता (आजारपण, वृध्तत्व वगळता) विहार करत राहिले पाहिजे. चातुर्मासात संत गृहस्ताच्या विंनतीवरुन एका ठिकाणी वास्तव्य करु शकतात.
रत्नऋषीजी महाराज यांच्या १९२७ साली अलीपुर येथील (संथारा) मॄत्युनंतर आनंदऋषीजीनी त्यांच्या गुरुशिवाय हिंगणघाट येथे पहिला चार्तमास केला. १९३१ साली आनंदऋषीजी यांच्या बरोबर झालेल्या धार्मिक चर्चेनंतर जैन धर्म दिवाकर महाराज यांना आनंदऋषीजीची आचार्य होण्याची क्षमता जाणवली.
        आचार्य आनंदऋषीजींनी २५ नोव्हेबर १९३६ साली श्री. तिलोक रत्न स्थानकवासी जैन धार्मिक परिक्षा बोर्डची स्थापना केली.

         १९५२ साली राजस्थान मध्ये सादडी येथे झालेल्या साधु संमेलन मध्ये त्यांना जैन श्रीमान संघाचा प्रधान म्हणुन घोषीत करण्यात आले. १३ मे १९६४ साली (फाल्गुन शुक्ल एकादशी) आनंदऋषीजी श्रीमान संघाचे दुसरे आचार्य झाले, याचा समारोह राजस्थान येथील अजमेर येथे झाला.

          आनंदऋषीजी १९७४ साली त्यांचा मुंबई येथील चार्तमास पुर्ण करुन पुण्याला आले. पुण्यात शनिवार वाडा येथे त्यांचे भव्य स्वागत समारंभ करण्यात आला. १३ फेब्रुवारी १९७५ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव नाईक यांनी त्यांना राष्ट्र संत म्हणुन गैरविले. त्याच वर्षी आनंद फाऊंनडेशनची स्थापना झाली हे त्यांचे ७५व्या वाढदिवसाचे वर्ष होते.
            आनंदऋषीजींनी २८ मार्च १९९२ साली अहमदनगर येथे त्यांचा मॄत्यु झाला. अहमदनगर येथील आनंदऋषीजी हॉस्पिट्ल हे त्यांच्या स्मरणार्थ बांधण्यात  आहे.

Friday, 25 April 2014

१०.रणगाडा संग्रहालय / Tank Museum Ahmednagar

१०.रणगाडा संग्रहालय:- 

अहमदनगर- सोलापूर रस्त्यावर फरह बक्ष महालाजवळ असलेले आर्मर्ड कोअर सेंटर & स्कूल ने १९९४ मध्ये उभारलेले हे संग्रहालय म्हणजे अहमदनगर शहराचेच नव्हे तर संपूर्ण देशाचेच भूषण आहे..आशिया खंडातील या एकमेव संग्रहालयात इंग्लंड,अमेरिका, रशिया, जर्मनी, जपान, फ्रांस आदी देशांची ४० पेक्षा जास्त विविध रणगाडे ठेवण्यात आले आहेत.जमिनीत पुरलेले सुरुंग नष्ट करणारे, रस्त्यातले अडथळे दूर करून सैन्याचा मार्ग मोकळा करणरे, पाण्यात तरंगणारे, असे विविध प्रकारचे रणगाडे येथे आहेत.

 

 जालियनवाला बाग हत्याकांडात जनरल डायर ने वापरलेले सिल्वर घोस्ट जातीचे चिलखती वाहन येथे ठेवण्यात आले आहे. खऱ्याखुऱ्या रणगाड्या बरोबर त्यांच्या प्रतिकृती आणि छायाचित्रे व लष्करी ध्वज आदींचे येथे प्रदर्शन एके. पाक युद्धात भारतीय सैन्याने नामोहरम केलेल्या रणगाडा येथे आहे. त्याच बरोबर बंगला युध्यत भारतीय सैन्याने जप्त केलेला पाकिस्थान चा ध्वजही येथे पहावयास मिळतो.बस स्थानकापासून अंतर ५ किमी. आहे.


९.स्नेहालय / Snehalaya

९. स्नेहालय :- 

उपेक्षितांचा आधारवड म्हणून स्नेहालय ओळखले जाते. सामाजिक परिवर्तन आणि अंत्योदयचा स्नेहालय हा एक अभिनव प्रयोग आहे. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या महिला, वेश्या, देवदासी, अनि त्यांच्या निराधार उपेक्षित संततीच्या सर्वांगीण पुनर्वसनाचे काम ही संस्था सन १९८९ पासून पाहते. नगर-मनमाड रस्त्यावरील नागपूर ओद्योगिक वसाहतीत स्नेहालय चा पुनर्वसन प्रकल्प आहे. तेथे वेश्यांच्या मुलं-मुलींसाठी वसतीगृह उभारण्यात आले आहे, प्रकल्पाची इमारत घुमटाकृती आहे. एड्स चा वाढता प्रसार लक्षात घेऊन अशा एड्सग्रस्त साठी आधार वसाहत व उपचार केंद्र स्थापन केले आहे.

 

 स्नेहालय तर्फे नगरच्या वेश्यावस्तीत संस्कार केंद्र चालवले जाते. अनौपचारिक व्यावसायिक शिक्षण, रात्रघर, आरोग्य प्रकल्प फसवल्या गेलेल्या महिलांसाठी स्नेहाधार, अडचणीतल्या मुलं-मुलींसाठी चाईल्ड लाईन असे संस्थेचे विविध उपक्रम आहेत. वेश्याव्यवसायात नव्याने मुली येऊ नयेत म्हणून स्नेहालय ने मोठी मोहीम हाती घेतलेली आहे. बस स्थानकापासून अंतर १२ किमी आहे.


८.चांदबीबी महाल / Chandbibi Mahal

८.चांदबीबी महाल :- 

अहमदनगर शहरात प्रवेश करतांना दूर डोंगरावर उभी असलेली ही वास्तू नजरेत भरू लागते. नगर-पाथर्डी रस्त्यावरील ही वास्तू खर तर मुर्तझा निजामशहा चा मंत्री सरदार सालाबत खान (दुसरा) याची कबर आहे. समुद्र सपाटीपासून ३०८० फुट उंचीवर, शहा डोंगराच्या पठारावर ही तीन माजली अष्टकोनी दगडी वास्तू बांधण्यात आली आहे. सालाबत खान सन१५८९ मध्ये वारला. पण त्याने आपल्या हयातीतच सन १५८० मध्ये ही कबर बांधून ठेवली.या इमारतीच्या तळघरात सालाबत खान आणि त्याच्या पत्नीची कबर आहे. तर वास्तूच्या आवरत दुसऱ्या पत्नीची आणि कुत्र्याची कबर आहे.

 

 महालाभोवती डोंगर उतरणीवर तीन तलाव बांधण्यात आले आहेत. पायथ्याशी वीरभद्र मंदिर आहे. जवळच विवेकानंद सागर तलाव आहे. महालाभोवती खिरनीची जुनी झाडी आहेत. निजामशाहीच्या काळात ही वास्तू लष्करीदृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जात असे. दुर्बिण महाल म्हणूनही या वास्तूचा उल्लेख केला जातो. ब्रिटिशांनी याचा उपयोग सैनिकांसाठी आरोग्य धाम म्हणूनही उपयोग केला. बस स्थानकापासून अंतर १२ किमी आहे.


७.तळ्यातला महाल ( फैजबक्ष महाल ) / Talyatala Mahal ( Faijbaksh Mahal )

७.तळ्यातला महाल ( फैजबक्ष महाल ):-

हश्त - बेहश्त बागेतील एका छोट्या तालावाच्यामाध्याभागी असलेली फैजबक्ष महालही अष्टकोनी दुमजली वस्तू सन १५०६ मध्ये अहमद निजामशाह च्या काळात बांधण्यात आली.या वास्तूचे आठ दरवाजे म्हणजे स्वर्गाचे आठ द्वारअसे म्हणाले जाते. पूर्वी या महालामध्ये जाण्यासाठी होडीचा वापर कराव लागत असे.या वस्तूच्या दक्षिणेकडे हमामखाना आहे. हमामखाना म्हणजे सार्वजनिक स्वच्छतागृह . परंतु हे फक्त बादशाह च्या परिवारातील लोकांसाठीच वापरले जात. पिंपळगाव व शेंदीच्या तलावातून येथे खापरी नळाने पाणी आणण्यात आले होते. येथील खेळती हवा व प्रकाश व्यवस्था पाहण्याजोगी आहे. पूर्वी येथे गुलाबाचे सुंदर उद्यान होते. अकबर पुत्र मुरड नगरवर स्वारी करण्यासाठी आला तेव्हा येथे मुक्कामाला होता. महालाजवळ लक्कड महाल ही वस्तू आहे. मुर्तझा दिवाना येथे अज्ञातवासात राहत होता. काही अंतरावर हवा महाल आहे.याचे वैशिष्ट्य म्हणजे हवा कुठल्याही बाजूने आली तरी मनोऱ्यावर असलेल्या झरोक्यातून प्रवाह आत येतो.

६.बागरोजा / Bagroja

६.बागरोजा :-

अहमदनगर शहराची स्थापना करणारा अहमद निजामशहा सीना नदीकाठी उभ्या असलेल्या या वस्तुत चिरशांती घेत आहे. या घुमटाकृती इमारतीभोवती दहा फुट उंचीचा कोट आहे. पूर्वी या परिसरात उद्यान होते, आता तेथे शेती केली जाते. बादशाह आणि त्याच्या पत्नीची कबर असलेल्या या वस्तूच्या घुमटाच्या आत, तसेच बाहेरच्या भिंतीवर सुंदर नक्षीकाम असून त्यावर कुराणातील वाचणे कोरण्यात आली आहे.बाहेरच्या बाजूस चौरसात व वर्तुळात वेगवेगळया प्रकारच्या भौमितिक रचना कोरण्यात आलेल्या आहेत.

घुमटाच्या मध्यभागी एक झरोका असून दिवसा सूर्याची व रात्री चांदण्यांची किरणे बरोबर बादशाह च्या कबरीवर पडतात.त्यावेळच्या रीतीरिवाजाप्रमाणे मुल कबरी तळघरात असाव्यात पण तेथे जायला रस्ताच नाही बगरोजाच्या आवारात बुऱ्हाण निजामशाह च्या पदरी असलेल्या व ज्याने निजामशाही ला शिया पंथीय बनवले तो शहा ताहीर व राज घराण्यातील इतर अनेक महत्वाच्या व्यक्तींच्या कबरी आहेत. मात्र अहमद निजामशहा वगळता इतर महत्वाच्या व्यक्तींची शव नंतर इराकमधील करबला येथे दफन करण्यात आली. या वस्तूकडे जाण्यासाठी साताळकर रुग्णालयाच्या बाजूने पायवाट आहे.


५.श्री विशाल गणपती / Shri Vishal Ganpati

५.श्री विशाल गणपती:-

अहमदनगर शहराचे श्री विशाल गणपती हे ग्राम दैवत आहे. शहरातील माळीवाडा भगत असलेली ही गणपती ची मूर्ती नावाप्रमाणेच विशाल महणजे ११ फुट आहे. या पूर्वाभिमुख उजव्या सोंडेच्या गणपतीची बैठक नेहमीपेक्षा वेगळीं असून मूर्ती विशिष्ट मिश्रणापासून तयार करण्यात आलेली आहे.

 

मूर्तीच्या बेंबीवर फणाधारी नाग आहे, तर डोक्यावर पेशवेकालीन पगडी आहे. गणेशोत्सवातील मिरवणुकीत पहिला मान या गणपती ला आहे.


४.बुऱ्हानगरची देवी / Burhanagar Goddess Temple

४.बुऱ्हानगरची देवी:-

कापूरवाडी तलावाकडे जात असतांना डाव्या बाजूला बुऱ्हानगर च्या देवीचे मंदिर दिसते. तुळजापूरच्या देवीचे हे जाज्वल्य ठाणे मानले जाते. सातवाहन काळातील राजा संभूराययाला आपल्या राजधानीचा त्याग करावा लागला त्यानंतर तो अंबाबाईची मूर्ती व सिंहासन घेऊन जंगलात येऊन राहिला.सातवाहन घराण्यातील अखेरचा राजा भीम याचा सेनानी चाहु याने तेलप चालुक्याच्या मदतीने संभू रायाचा प्रभाव करून देवीची मूर्ती आपल्याबरोबर नेली अशी कथा सांगितली जाते.

 

नवरात्रोत्सवाच्या काळात तिसऱ्या मालेस येथे मोठी यात्रा भरते.देवीचा पलंग तुळजापूरला वाजत गाजत नेला जातो.ही परंपरा संत जनकोजी यांच्यापासून चालू आहे. देवीचे हे मंदिर सन १९१३ मध्ये लहानू भिकाजी भगत यांनी बांधले. अलीकडेच त्याचा जीर्णोद्धार झाला. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर तेलाचा घन आहे. समोर सिंहाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन भाविक आत जातात.जगदंबा मातेचीमुर्ती काळ्या शिळेची आहे. मिरवली पहाडावर जाणारा रस्ता बुऱ्हानगर वरूनच जातो. याचे बस स्थानकापासून चे अंतर ४.५ किमी आहे.


३.फाराह्बक्ष महाल / Farah Baksh Mahal

३.फाराह्बक्ष महाल:-

अहमदनगर मधील हवामान उष्ण आणि कोरडे आहे.निजामशाहीच्या काळात उन्हाळा सुसह्य व्हावा म्हणून उद्यानात जल महाल बांधण्यात आले. चौरसाकृती तलावाच्या मध्यभागी असलेल्या फरह बक्ष महालाची गुलाबी, अष्टकोनी वस्तू पाहून शहाजहान ला आपल्या प्रिय पत्नीच्या मृत्युनंतर ताजमहालाची कल्पना सुचली असे म्हणतात. हा महाल सन १५७६ ते १५८३ मध्ये बांधण्यात आल्याचे सांगितले जाते.

मुर्तझा निजामाशाहाला त्याने महाल बांधण्यास सांगितले.नंतर सालाबत खान (दुसरा) याने हे काम पूर्ण केले.घुमत, उंच कमानी व मोठी गवाक्षे असलेल्या या इराणी वास्तुशैलीच्या दुमजली महालाच्या मध्यभागी रंगमहाल आहे.तिथे नृत्य गाणी चालत.तेथे कारंजी असून त्यासाठी खापरी नळाने पाणी आणण्यात आले होते.बादशाह आपल्या राजस्त्रिया व पाहुण्यांसह येथे मौजमजेसाठी येत. अकबराचा सेनापती खान खनान याने नगरवर स्वारी करण्यासाठी आला तेव्हा येथेच मुक्काम केला होता. लढाईला जाताना सदाशिव पेशवे यांनी सुद्धा येथे मुक्काम केला होता.


२.दमडी मशीद / Damadi Masjid

२.दमडी मशीद:-

दगडावर केलेले अप्रतिम कोरीव काम साठी ही मशीद प्रासिध्द आहे. ही मशीद भुईकोट किल्ल्यापासून बुऱ्हानगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे. आशिया खंडातील १० आदर्श मशिदीमध्ये हिची तुलना होते.निजामशाही मधला सरदार सहेल खान याने इसवी सन १५६७ मध्ये ही मशीद बांधली. दमडी हे तेव्हाचे नाण्याचे नाव होते.

 

तिच्या बांधकामाच्य वेळी तिथे एक फकीर बसत असे. मजुरांनी दिलेल्या दमड्या साठवून त्याने ही मशीद बांधल्याचे सांगितले जाते.मिनारांवर तसेच दर्शनी भागात कमळाची फुले कोरण्यात आली आहेत. समोरच्या भिंतीमध्ये कुराणातील वाचणे कोरण्यात आली आहेत. मशिदीतील संगमरवरी दगडावर अल्ला आम्हाला विजय मिळवून द्याअसे कोरण्यात आले आहे. या मशिदीच्या परीअरात एक बाराव असून त्यात एक थडगे आहे. तसेच अनेक कबरी आहेत.


१.अहमदनगरचा किल्ला / Ahmednagaar Fort

१.अहमदनगरचा किल्ला :-

निजामशाहीची राजधानी अहमदनगर होती.१४९० मध्ये बहामानीचा सेनापती जहांगीर खान याच्याशी झालेल्या लढाईत मधील विजयाच्या प्रीत्यर्थ निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद याने कोट बाग निजामनावाचा महाल स्वतः साठी बांधला.येथूनच किल्ल्याच्या बांधकामाची सुरुवात झाली.हुसेन निजामशाह या अह्मद्शाहाच्या नातुने पुढे शत्रूच्या आक्रमणाची शक्यता लक्षात घेवून २२ बुरुज असलेला मजबूत कोट निर्माण केला.

 

१ मैल ८० यार्ड परीघ आणि तटबंदी भोवती रुंद खंदक असल्याने हा किल्ला अभेद्य बनला होता. किल्ल्यात सोनमहाल, गगनमहाल,मिनामहाल बगदाद महाल, मुल्क आबाद, दिल काषद हे महाल होते. १९४२ च्या आंदोलनात पंडित जवाहरलाल नेहरू सह १२ नेत्यांना किल्ल्यात स्थानबद्ध करण्यात आले होते. निजामशहाच्या महालाचे अवशेष आजही किल्ल्यात पाहायला आहेत.


हुतात्मा करवीर चौथे छ्त्रपती शिवाजी महाराज / Hutatma Karvir Chouthe Shivaji Maharaj


                  १८३१ ते १८७१ पर्यंत हुतात्मा करवीर चौथे छ्त्रपती शिवाजी महाराज कोल्हापूर संस्थांचे राजे होते. नारायण राव दिनकरराव भोसले यांच्या घरी त्यांचा जन्म झाला. त्यांना राजाराम महाराज पहिले यांच्या विधवा पत्नीने वयाच्या आठव्या वर्षी दत्तक घेतले होते. वयाने लहान असल्याने चौथ्या शिवाजी महाराजांचे प्रतिनिधी त्यांचे काम पाहत. एडवर्ड सातवा याने महाराजांना मनाची तलवार दिली.

                 वयाच्या १३ व्या वर्षी त्यांना केसर ए हिंद हा किताब मिळाला. त्यावेळी हा किताब मिळवणारे ते सर्वात लहान होते. इंग्रजांनी १८८२ साली महाराजांना वेडे ठरवून अहमदनगर च्या तुरुंगात डांबले. एका इंग्रज अंग रक्षकाने मारहाण केल्यामुळे २५ डिसेंबर १८८३ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

भुईकोट किल्ला / Ahmednagar Fort




आदिलशाही, कुतूबशाही, हैद्राबादची निजामशाही आदीविरुद्ध बहामनी सेनेचं आक्रमण थोपविण्याची जबाबदारी अहमद निजामशहावर पडल्यानंतर आपल्या अतुलनीय शौर्यानं ज्या ठिकाणी बहामनी सेनेला धूळ चारून विजय मिळविला तो गर्भगिरी पर्वत रांगांलगतचा हा निसर्गरम्य प्रदेश.

नगरच्या भुईकोट किल्ल्याला प्राप्त झालेलं सामरिक महत्त्व तेव्हापासून आजतागायत टिकून आहे. एक मैल ८० यार्ड परिघ असलेला हा किल्ला आशिया खंडातील मोठय़ा किल्ल्यांपैकी अग्रक्रमावर असलेला किल्ला, सर्व बाजूंनी खोल खंदक, खंदकाबाहेर मातीच्या उंच टेकडय़ा यामुळे सहजासहजी शत्रूच्या दृष्टिपथात न येण्यासारखी या किल्ल्याची बांधणी. टेकडय़ांमुळे बुरुजांवर तोफा डागणं अशक्य त्यामुळे किल्ल्याची अभेद्यता वाढली. वर्तुळाकार असलेल्या किल्ल्याला २२ बुरूज आहेत. अहमद निजामशहानं आपल्या कर्तबगार, मुत्सद्दी प्रधान, सेनापती आदींची नावं बुरुजांना देऊन त्यांचा सन्मान केल्याचं दिसून येतं. तटबंदीच्या आतील बाजूस एकूण सहा राजमहाल होते.सोनमहल, मुल्क आबाद, गगन महल, मीना महल, बगदाद महल, अशी त्यांची नावं. इमारतींच्या मध्यभागी एक मदरसाही बांधला होता. या मदरशातच राजघराण्यातील मुलांचं शिक्षण होत असे. दिलकशाद, हबशीखाने अशा इतर वास्तूंची निर्मिती गरजेप्रमाणे होत गेली. छोटेखानी गावच किल्ल्याच्या तटबंदीआड वसलं होतं. या साऱ्यांच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून चार मोठय़ा विहिरीही खोदण्यात आल्या. गंगा, यमुना, मछलीबाई, शक्करबाई अशी त्यांची नावं होती. आता या विहिरींचं आणि महालांचं अस्तित्व दिसत नाही. कोटबाग निजामआणि आसपासच्या इतर देखण्या वास्तूंमुळे येथे वैभवशाली नगरी वसली. त्या काळी या नगरीची तुलना बगदाद, कैरोसारख्या तत्कालीन सुंदर नगरांशी झाल्याचे उल्लेख इतिहासात सापडतात. निजामशाही, मोगलाई, पेशवाई, ब्रिटिश अशा अनेक राजवटी या किल्ल्यानं अनुभवल्या. राजवटीनुरूप या वास्तूच्या जडणघडणीतही बदल घडले. निजामांनी किल्ल्यात वास्तव्य केले. मोगलांनी किल्ल्याचा सामरिक वापर केला. तर ब्रिटिशांनी या किल्ल्याचा वापर कारागृह आणि दारूगोळा निर्मिती केंद्र म्हणून केला.

एक मैल ८० यार्ड परिघ असलेला हा किल्ला आशिया खंडातील मोठय़ा किल्ल्यांपैकी अग्रक्रमावर असलेला किल्ला, सर्व बाजूंनी खोल खंदक, खंदकाबाहेर मातीच्या उंच टेकडय़ा यामुळे सहजासहजी शत्रूच्या दृष्टिपथात न येण्यासारखी या किल्ल्याची बांधणी आहे.

इतिहासातील अनेक कडूगोड स्मृती कोटबाग निजामने आपल्या उदरात सामावून ठेवल्या आहेत. कधी या किल्ल्याने तत्कालीन परदेशी मुस्लिमांच्या शिरकाणाने प्रचंड नरसंहार अनुभवला. तर कधी फंदफितुरीची अनेक कारस्थानं इथंच शिजली. अनेकदा भाऊबंदकीची नाटय़ं घडली. अनेकदा शौर्याचे प्रसंग या किल्ल्याने अनुभवले. कित्येकदा किल्ल्याला वेढा पडून तहाचे प्रसंग उठवले. जिथे सुलताना चाँदच्या शौर्याचा दिमाख इथल्या शिळांनी अनुभवला तिथेच चाँदच्या भीषण हत्येचा साक्षीदार याच पाषाणचिरांना व्हावं लागलं. मोगलांनी किल्ला सर करण्यासाठी जंगजंग पछाडलं, तर पेशव्यांनी बंदुकीची गोळीही न उडविता मुत्सुद्देगिरीने किल्ला काबीज केला. किल्ल्यासाठी अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले.


िहदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनाही या किल्ल्याने भुरळ घातली होती. या किल्ल्याचे सामरिकदृष्टय़ा असलेलं महत्त्व ते जाणून होते. त्याहीपेक्षा आपल्या वाडवडिलांची कर्मभूमी असल्याने हा किल्ला आपल्या अमलाखाली असावा, असं शिवाजी महाराजांना नेहमी वाटत असे. महाराजांच्या सैन्यानं हा प्रांत तीन वेळा लुटला यावरून इथल्या सुबत्तेची कल्पना येते. मोगलांचा किल्लेदार मुफलत खान याने सर्व संपत्ती किल्ल्यात आणून ठेवल्याने मराठी सैन्याच्या हाती फारसं काही लागलं नाही. किल्लाजिंकणं ही शिवाजी महाराजांची मनीषाही अपूर्णच राहिली.


सुलताना चाँदच्या हत्येनंतर सन १६०० मध्ये पहिल्यांदा हा किल्ला मोघलांच्या ताब्यात गेला. पुढे मोघलांचा सरदार कवी जंग याला वैयक्तिक जहागिरी बहाल करून पेशव्यांनी कोणत्याही रक्तपाताविना, मुत्सुद्देगिरीनं हा किल्ला पेशवाईच्या अमलखाली आणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण केलं. कालांतराने ब्रिटिशांनी पेशव्यांकडून हा किल्ला हस्तगत केला. किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी इंग्रज सेनापती जनरल ऑर्थर वेलस्ली याने खंदकाशेजारील चिंचेच्या झाडाखाली बसून न्याहारी केली. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ या ठिकाणी चार तोफा ठेवण्यात आल्या आहेत.


सन १७६७ मध्ये सदाशिवभाऊ (तोतया), १७७६मध्ये पेशव्यांचे सरदार सखाराम हरी गुप्ते यांना येथे कैदेत ठेवण्यात आले होते. राघोबादादांचे अधिकारी चिंतो विठ्ठल रायरीकर, नाना फडणविस, मोरोबा दादा, िशद्यांचे दिवाण बाळोबा तात्या, सदाशिव मल्हार, भागिरथीबाई िशदे यांना याच किल्ल्यात तुरुंगवास घडला. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांनी जर्मन कैद्यांनाही याच किल्ल्यात ठेवलं होतं.


इंग्रज राजवटीच्या विरोधात चलेजाव आंदोलनाचं लोण १९४२ साली देशभर पसरल्यानंतर आंदोलनाचे नेते पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद, गोिवद वल्लभ पंत, आचार्य नरेंद्र देव, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित हरिकृष्ण मेहताब, आचार्य कृपलानी, डॉ. सय्यद महेबुब, डॉ. पट्टाभी सीतारामय्या, अरुणा असफअली, डॉ. पी. सी. भोज, आचार्य शंकरराव देव आदी नेत्यांना या किल्ल्यात डांबण्यात आले होते. बंदिवासात असताना पंडित नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडियाहा ग्रंथ लिहिला. अबु कलाम आझाद यांनी गुबारे खातीरया ग्रंथाचे लेखन याच किल्ल्यात केले. चौथ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गूढ मृत्यूही याच किल्ल्यात झाला. ब्रिटिशांच्या काळात किल्ल्यात बरेच बदल झाले. किल्ल्याच्या पूर्वेला असलेला झुलता पूल १९३२ साली ब्रिटिशांनी बांधला. काडतुसे निर्मितीची प्रयोगशाळा किल्ल्यात उभारली. तिला रॉकेटरूम म्हटलं जायचं.


भारतीय स्वातंत्र्याच प्रतीक म्हणून १५ ऑगस्ट १९४७ साली दिल्लीत झेंडावंदन सुरू असतानाच या किल्ल्यावरील ब्रिटिशांचा युनियन जॅकउतरविण्यात आला. भारतीय स्वातंत्र्य सुवर्णमहोत्सवी सोहळा याच किल्ल्यात पार पडला. भारतीय स्वातंत्र्यानंतर या किल्ल्याचं महत्त्वं जरी वाढलं तरी हा किल्ला लष्करी हद्दीत असल्यानं तिथे लष्करी कार्यालय सुरू करण्यात आलं. तेव्हापासूनच पुरातत्व खात्याचं या किल्ल्याकडे दुर्लक्ष झालं. खंदकात प्रचंड झाडी वाढली, इलाही बुरुजाकडे जाणारा पूल कोसळला. दगडी तटबंदीतून झुडपं वाढल्याने किल्ल्याच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला.


महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास योजनेत किल्ल्याचा समावेश झाल्याने किल्ल्याच्या सुशोभीकरणाच्या कामाने आता वेग घेतला आहे. किल्ल्याभोवतालच्या संरक्षक िभती व कठडय़ाच काम पूर्ण झालेलं असून परिसरातील नियोजित नेहरू उद्यानाचे भूमिपजून किल्ला महोत्सवदिनी राज्यपाल के. शंकरनारायणन्, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे सभापती दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आलं. नेहरू उद्यान लवकरच आकार घेईल, त्याचबरोबर किल्ल्याच्या आत संग्रहालय, ग्रंथालय, कलादालन, पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा, माहितीपुस्तिका आदी सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी शासनाने ५६ कोटी रुपयांच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. किल्ल्याच्या तटबंदीजवळ खंदकात नौकानयन, सायंकाळी लेझर-शो आदी योजनाही कार्यान्वित होतील. किल्ल्यात घडलेल्या ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित ध्वनिप्रकाशयोजनेच्या सहाय्यानं माहिती देण्यासाठी संहितालेखन सुरू आहे.


यंदा पहिल्यांदाच किल्ला महोत्सव साजरा करण्यात आला. या पर्यटनस्थळाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी, यासाठी क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्राच्या महानायिकांच्या बहारदार कार्यक्रमाबरोबरच शोभेच्या दारूची आतषबाजीही करण्यात आली. लवकरच ५२१ वर्षांच्या इतिहासाची साक्ष देणारा कोटबाग निजाम’ ‘भुईकोट किल्लाआपल्यातील जुनेपण जपत, नवा साज लेवून पर्यटकांशी संवाद साधेल.

अहमदनगर शहराला माझी तशी पहिलीच भेट. राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला हा जिल्हा कसा असेल याचा विचार मनात सुरु होता. वेळ कमी असल्याने मी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांना भेट द्यायचे ठरवले. अहमदनगरचे जिल्हाधिकारी कार्यालय व महानगरपालिका कार्यालयाला भेट दिल्यानंतर मी ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या दिशेने निघालो. हा किल्ला कसा असेल, त्याचे ऐतिहासिक महत्त्व काय, किल्ल्याची अवस्था आता कशी असेल असे असंख्य प्रश्न मनात येत होते.

किल्ल्याजवळ पोहचताच किल्याजवळील विकास कामे पाहून आनंद झाला. या किल्ल्याचे रुपांतर राष्ट्रीय स्तरावरील पर्यटन केंद्रात करण्यासाठी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. अन्बलगन यांनी प्रयत्न सुरु केले असल्याची माहिती मिळाली. किल्ल्यात प्रवेश करताच इतिहासातील अनेक आठवणी जाग्या झाल्या. स्वातंत्र्यलढयातील अनेक घटनांचा हा किल्ला साक्षीदार आहे. १९४२ च्या चले जाव आंदोलनातील पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित गोविंद वल्लभ पंत, पंडित हरेकृष्ण मेहताब, आचार्य जे.बी. कृपलानी, डॉ. सय्यद महसूद, डॉ. पट्टाभी सीतारामय्या, बॅ असफ अली, डॉ. पी. सी. घोष, शंकरराव देव, आचार्य नरेंद्र देव अशा १२ राष्ट्रीय नेत्यांना १० ऑगस्ट १९४२ पासून २८ एप्रिल १९४५ या काळात ब्रिटीशांनी अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात स्थानबध्द केले होते. स्थानबध्दतेच्या या काळात पंडित नेहरुंनी केलेला पत्रव्यवहार, त्यांच्याच हस्ताक्षरातील पत्रे येथे जतन करुन ठेवली आहेत. ती वाचतांना नेहरुजींचे सुंदर हस्ताक्षर, त्यांचे विचार, त्याचे हिंदी बरोबरच इंग्रजी आणि उर्दू भाषेतील प्रभुत्व पाहून अभिमान वाटतो.

चले जाव आंदोलनातील या सर्व नेत्यांना ज्या खोल्यांमध्ये स्थानबध्द करुन ठेवले होते त्या खोल्यांमध्ये गेल्यानंतर या नेत्यांची माहिती छायाचित्रांसह पाहिल्यावर, वाचल्यावर त्यांच्या उत्कट देशप्रेमाची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. पंडित जवाहरलाल नेहरुंनी या किल्ल्यातील स्थानबध्दतेच्या काळात अवघ्या ५ `महिन्यात` `डिस्कव्हरी ऑफ इंडिया ` हा प्रसिध्द ग्रंथ लिहिला होता.

किल्ल्यात पंडित नेहरुंना स्थानबध्द केलेल्या खोलीत एक कॉफीटेबल बुक ठेवले आहे. त्यामध्ये स्वातंत्र्यलढयातील अनेक प्रसंगांची तपशिलवार माहिती तसेच दूर्मिळ छायाचित्रे आहेत. या कॉफीटेबल बुकच्या मुखपृष्ठावर `Life of Nehru Fragrance that still remains `( नेहरुंचा जीवनपट- सुगंध अजून दरवळतो आहे) असे लिहिले आहे. हे वाचतांना या खोलीत स्वातंत्र्यलढयातील घटनांबरोबरच देशभक्तीचा सुगंध अजूनही दरवळत असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही.

१४९० मध्ये अहमद निजामशाहने निर्माण केलेला हा किल्ला स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असून जमिनीवर बांधलेला एकमेव किल्ला आहे. तेव्हा या भुईकोट किल्ल्याला आपण सर्वानी जरुर भेट दिली पाहिजे.